पुणे - सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. पण, ऊसाच्या शेतात आग लागल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आज सकाळी आग लागल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे समोर आली आहे. या आगीत एका शेतातील पाच एकर ऊस जळून भस्मसात झाला आहेत.
अवसरी बुद्रुक येथे सोपान खिलारी,शांताराम हिंगे, सुनील शिंदे या शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला लागून महावितरणच्या वीज तारा गेल्या आहेत. या तारांमध्ये घर्षण होऊन ऊस शेतीला आग लागल्याचे सांगितले जात आहे. सध्या ऊस तोडणीला आल्याने विजेच्या ठिणग्यांमुळे ऊस लवकर पेट घेत आहे. त्यामुळे आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
आतापर्यंत झालेल्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काबाडकष्ट करुन वाढविलेली पिके डोळ्यासमोर जळताना पाहताना शेतकरी हवालदिल होत आहेत. त्यामुळे महावितरण आणि प्रशासनाकडून या घटनांवर प्रतिबंध घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत.