पुणे : मंडपाच्या गोडावूनला लागलेल्या आगीत तीन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील वाघोली परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत चार गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलींगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
आगीत चार सिलेंडरचा स्फोट : वाघोली परिसरातील उबाळे नगरमधील शुभ सजावट या मंडपाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये सजावटीचे साहित्य ठेवण्यात येते. या गोडावूनला मध्यरात्री 11 वाजून 43 मिनिटांनी भीषण आग लागली. आगीत चार सिलिंडर फुटल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. या आगीत तीन कामगारांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आगीची माहिती मिळताच पुणे शहरातील अग्निशमन दलाच्या पाच आणि पीएमआरडीएच्या चार अशा 9 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
आगीत कामगारांचे आढळले मृतदेह : शुभ सजावट या गोडावूनला आग लागल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. यावेळी या गोडावूनमधील कामगारांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे या कामगारांच्या मृतदेहांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. ही आग एव्हढी भीषण होती की परिसरात आगीचे लोळ दिसून येत होते. मात्र मध्यरात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राणांची बाजी लावून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.
चारशे सिलिंडरचे गोडाऊन होते बाजुला : शुभ सजावट या मंडपाच्या गोडावूनला भीषण आग लागून यात तीन कामगारांचा मृत्यू झाला. या गोडावूनमधील साहित्य जळून खाक झाले आहे. वाघोलीतील या आगीत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. मात्र या गोडावूनच्या शेजारीच तब्बल चारशे सिलिंडरने भरलेले दुसरे गोडावून होते. त्यामुळे या आगीवर लवकर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग इतर ठिकाणी पसरू न दिल्याने हा धोका टळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Dhamma Padayatra : दीक्षाभूमी ते लेह लद्दाख धम्म पदयात्रेला सुरूवात; थायलंडचे 100 भंते सहभागी