पुणे - शिरूर तालुक्यात अष्टविनायक महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यापैकीच एका खड्ड्यातील पाण्यात बुडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईंकांनी केला आहे, तसेच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. संतोष इचके असे त्या मृत चिमुकलीच्या वडिलांचे नाव आहे.
शिरूर तालुक्यात कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या बाजुलाच मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यात पावसाने पाणी साचले आहे. बेल्हेकर इन्फ्रा स्ट्रक्चरच्या या कंपनीकडून या रस्त्याचे काम सुरू आहे. रविवारी दुपारी रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या खड्ड्यात संतोष इचके यांची दोन वर्षाची मुलगी खेळत होती. त्यावेळी ती अचानक खड्ड्यात पडली आणि पाण्यात बुडाली. त्यातच चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला.
कारवाईसाठी रास्ता रोको, पोलिसांची घटनास्थळी भेट-
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप करत रस्ता रोको आंदोलन केले. तसेच त्या बेल्हेकर इन्फ्रा स्ट्रक्चरच्या या बेजबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. घडलेल्या घटनेने काळूबाईनगर परिसरात ऐन दिवाळीच्या काळात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबधित घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही सहाय्यक पोलीस निरिक्षक काबुगडे यांनी नातेवाईक व उपस्थितांना दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.