पुणे - महाविद्यालयीन तरुणाने मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पेरणे फाटा येथे उघडकीस आली आहे. दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (१९), असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.
दिवाकरचे कुटुंबीय नोकरीनिमित्त पेरणेफाटा येथे स्थायिक झाले आहेत. तो वाघोली येथील महाविद्यालयात कॉमर्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून तो रात्र-रात्रभर मोबाईलवर गेम खेळत होता. गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेलेला नव्हता. आज अचानक त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वाना धक्का बसला आहे. त्याने नेमक्या कोणत्या गेमच्या आहारी गेल्यामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.
लोणीकंद पोलिसांनी दिवाकरचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यात त्यांना काही अनाकलनीय कोडवर्ड्स आढळले आहेत. शिवाय घरात सापडलेल्या एका चिट्ठीत "आवर सन विल शाईन अगेन', "पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर फ्री झाला, आता कसल्याही बंधनात राहिला नाही,' "द एंड' असा मजकूर लिहिलेला आढळला. शिवाय त्याच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक डिपीलाही मोबाईल गेममधील 'ब्लॅक पँथर' या कॅरेक्टरचा फोटो होता. कुटुंबीयांनी त्याचे मरणोत्तर नेत्रदान केले आहे.