चाकण(पुणे) - भामा-आसखेड धरण परिसरात 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करुन विवस्त्रावस्थेत मृतदेह टाकण्यात आला होता. त्यामुळे पीडित तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या केल्याची नातेवाईकांनी तक्रार केली आहे. तत्काळ गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करावी, अशी मागणी करत मृत मुलीचे नातेवाईक चाकण पोलीस ठाण्यात काही वेळ ठिय्या मांडून बसले होते.
भामा-आसखेड परिसरात करंजविहिरे येथे एका 17 वर्षीय तरुणींची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतदेह विवस्त्रावस्थेत झाडांमध्ये टाकण्यात आला होता. त्यामुळे या पीडितेवर अतिप्रसंग करुन तिची हत्या केल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी सांगितले आहे.