पुणे - कात्रज चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आलिशान मोटारीमधून तस्करी करून आणलेले 17 किलो अफू जप्त केले आहे. राजस्थानमधून तस्करी करून हे अंमली पदार्थ पुण्यात आणले होते. पोलिसांनी या प्रकरणी महिपाल गणपत बिष्णोई (वय 30) याला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - उल्हासनगरात कार्यकर्त्यांनी बंद पाडले 'छमछम'
गाडीच्या डिकीत 17 किलो अफू
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कात्रज चौकामध्ये वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक नियमन करत होते. यावेळी त्यांनी त्या ठिकाणाहून जाणारी एक संशयास्पद होंडा सिटी कार थांबवली. या गाडीच्या झडती दरम्यान डिकीमध्ये अफू असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीच्या डिकीमधील एका पोत्यामध्ये भरलेली अफूची बोंडे त्यांनी जप्त केली. आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. त्याने अफू कुठून आणली होती, कुठे घेऊन चालला होता, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - मुंबई; ४० लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त