बारामती - शहर व तालुक्यात सुपर स्प्रेडरमुळे कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत आहेत. प्रशासनाच्या वतीने सुपर स्प्रेडरच्या शोधासाठी हॉटस्पॉट गावांमध्ये अँटीजेन तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. संपूर्ण तालुक्यात १३० सुपर स्प्रेडर सापडले आहेत. मात्र संचारबंदी असतानाही वेगवेगळ्या कारणांसाठी लोक गर्दी करत असल्याने बारामतीत विनाकारण फिरणाऱ्या २४४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळून आल्या आहेत. अशा एकूण १५२ सुपर स्प्रेडरचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बारामती शहर व तालुक्यात कहर केला आहे. दररोजची रूग्णसंख्या देखील ४०० च्या घरात पोहचली आहे. बारामती तालुक्यातील गावांमध्ये देखील सुपर स्प्रेडरच्या शोधासाठी अँटिजन तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५ हजार ३३२ संभाव्य सुपर स्प्रेडर निश्चित केले. यापैकी ३ हजार ३६५ जणांच्या तपासण्या केल्या. यापैकी लक्षणे असणाऱ्या १ हजार ८९ नागरिकांंची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १३० रूग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. यामध्ये दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात आल्या. तालुक्यात आतापर्यंत तब्बल १३० सुपर स्प्रेडरची नोंद झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांंमध्ये देखील २२ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
तत्पूर्वी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ५ एप्रिल पासून बारामती शहर व तालुक्यामध्ये टाळेबंदी, तसेच कडक निर्बंध लावण्यात आले. मात्र २१ दिवस उलटले तरी रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर व तालुक्यातील सुपर स्प्रेडरचा शोध घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार फिरत्या लॅबच्या माध्यमातून बारामती शहरात शुक्रवार (दि.२३) पासून विनाकारण बाहेर फिरणाऱ्याच्या अँटीजन तपासण्या सुरू करण्यात आल्या. दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणाचा वेग जास्त आहे. पहिल्या लाटेमध्ये वृद्ध व्यक्तींना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये तरूण व्यक्तीसुद्धा कोरोनामुळे गंभीर होत आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटाईझर आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अधिकाधिक प्रभावी वापर प्रत्येकाने करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी केले आहे.