पुणे : राज्यात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. मात्र, हा पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर झाल्यामुळे परीक्षा आयोजित करणाऱ्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गणिताचा पेपर पुन्हा होणार नाही : महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, 'पेपर फुटला असे मी म्हणणार नाही. गणिताचा पेपर कधी व्हायरल झाला ते तपासावे लागेल'. या संपूर्ण प्रकणाची तपासणी केली जाईल, या पुढे पेपर व्हायरल होणार नाही याची काळची घेतली जाईल असे गोसावी म्हणाले. आज सकाळी 10 वाजाच्या सुमारास पेपर फुटल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना अकरा वाजता पेपर दिला जाणार होता. मात्र, त्या आगोदरच पेपर व्हायरल झाल्याने विरोधी पक्षाने देखील सरकारव ताशेरे आढेले आहेत.
पोलिस यंत्रणेमार्फत तपास : बारावीचा गणिताचा पेपर फुटीची तपासणी करण्यात येणार आहे. गणित विषयाच्या पेपरची 2 पाने समाज माध्यमावर व्हायरल झाली आहेत. ती कोणी केली? त्यामागे त्यांचा काय हेतु होता? यामागे रॅकेट आहे का? याची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे.या प्रकरणात सहभागी विद्यार्थ्यांसह इतर संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती गोसावी यांनी ईटीव्हीशी बोलतांना दिली.
गणिताच्या पेपरात सावळा गोंधळ : परीक्षेपूर्वीच गणिताचा पेपर फुटल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा पेपर कसा फुटला याला जबाबदार कोण, याचा तपास सुरू आहे. याबाबत कोणीही अधिकारी बोलण्यास तयार नसले तरी, शिक्षण विभागाने खुलासा केल्यानंतर यातील सत्य बाहेर येईल. यापूर्वी इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरपत्रिकेत उत्तर छपाईचा प्रकार समोर आल्यानंतर आता गणिताच्या पेपरमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे.
गणिताचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार : राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र, यंदाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बारावीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे देण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळमध्ये इंग्रजी विषयाचा पेपरमध्ये गोंधळ झाला होता. हिंदीच्या पेपरमध्ये चुका झाल्याचेही पुढे आले होते. दुसरीकडे इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या सहा शिक्षकांवरसह विद्यार्थ्यांवर परभणीतील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Underworld Don Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव