पुणे - पुण्यातील एम्प्रेस गार्डन परिसरातून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०६ किलो गांजा जप्त केला आहे. बाजारभावानुसार या गांजाची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रोहित विष्णू काळे आणि सिध्दार्थ बबन ननावरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मागील काही दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला पुण्यातील एम्प्रेस गार्डनजवळून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एक चारचाकी वाहन पकडले. यामध्ये १०६ किलो गांजा आढळला. अटकेत असलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा विक्रीसाठी मुंबईला घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. मागील सहा महिन्यात सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला. जप्त केलेल्या या गांजाची किंमत 1 कोटी रुपयांहून अधिक आहे.