पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात दररोज एक हजार टन कचरा निघतो. त्यावर मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेऊन प्रक्रिया केली जाते. मात्र, पावसाळा आला की कचरा डेपो शेजारी राहत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेकडून कोट्यवधींची टेंडर काढले जातात. मात्र, त्यातून केवळ मलिदा लाटण्याचे काम महानगर पालिकेकडून होते असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
हेही वाचा- होळीच रंगीत चित्र, जाणून घ्या देशभरात कुठे, कशी साजरी केली जाते
कोट्यवधींचे टेंडर निघतात
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या 25 लाखांपेक्षा अधिक आहे. शहरात ओला आणि सुखा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. महानगर पालिकेच्या वतीने कचरा जमा करून तो मोशी येथील कचरा डेपोत घेऊ जातात. तिथे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यादरम्यान महानगर पालिकेकडून कोट्यवधींचे टेंडर निघतात, यातून गैरव्यवहार होतात, यापलीकडे दुसरे काम होत नाही. असा आरोप भापकर यांनी केला आहे.
कचऱ्याचे विलगीकरण होत नाही
तसेच कचऱ्याचे विलगीकरण होत नाही. एकत्रित रित्या हा कचरा मोशी डेपोत एकत्र केला जातो. कचऱ्याचे मोठं मोठे डोंगर तयार होत आहेत. त्यांची दुर्गंधी सुटते. त्यावर औषध फवारायला हवे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. यावर प्रशासनाने पर्याय काढला पाहिजे. असे मारुती भापकर म्हणाले. दरम्यान, इतर ठिकाणी कचरा डेपो सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले . सध्या तरी योग्य पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा त्यांनी म्हटले आहे.