पुणे - कोरोना आजाराने शारीरिक हल्ला करत अनेकांचे जीव घेतले. अनेक जणांना मानसिक धक्का दिला. सामाजिक आरोग्य बिघडवले, तसे सामाजिक अंतर ही वाढवले. या आजाराशी लढतांना काही ठिकाणी भावनिक आणि नातेसबंध दृढ झाले. मात्र काही नात्यांमधील वीणच उसवून टाकली, याचा प्रत्यय येतो तो स्मशानभूमीमध्ये कित्येक महिन्यापासून नातेवाईकांच्या प्रतीक्षेत असलेल्या कोरोना मृतांच्या अस्थि कलशावरून.
पुणे शहरात कोरोनाचा कहर हा पहिल्या लाटेतही पहायला मिळाला आणि दुसऱ्या लाटेत ही पहायला मिळत आहे. मार्च, एप्रिल आणि मेच्या मध्यापर्यत पुणे शहरात दररोज शंभर पेक्षा ज्यास्त मृत्यू होत होते. पुण्यात कैलास स्मशानभूमीत सर्वात ज्यास्त कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि करण्यात येत आहेत. या कैलास स्मशानभूमीत गेल्यावर एक हृदय हेलवणारे दृश्य गेल्या काही काळात पहायला मिळते आहे आणि ते दृश्य आहे, नातेवाईकांच्या प्रतीक्षेत असलेल्या कोरोना मृतांच्या अस्थि कलशांचे.
100 अस्थिकलश नातेवाईकांच्या प्रतीक्षेत
कैलास स्मशानभूमीच्या एका खोलीत हे कलश सध्या बेवारस अवस्थेत पडून आहेत. कोरोना आजार झाल्यानंतर रुग्ण हा समाजातूनच उठतो असा अनुभव गेल्या एक वर्षांपासून सर्वांनाच येतो आहे. कोरोनाची लागण झाली की लांबचे जवळचे सर्वच नातेवाईक रुग्णापासून दुरावतात आणि काही कोरोना रुग्णांची ही परवड मृत्यूनंतर ही संपलेली नाही, हे या अस्थिकलश पाहिल्यानंतर लक्षात येते. हिंदू धर्मात मृत्यूनंतर जवळचे नातेवाईक मृतांच्या अस्थिसंगमाच्या ठिकाणी विसर्जित करतात. या निमित्ताने मोक्ष प्राप्त होतो असे धार्मिक प्रमाण आहे. मात्र कोरोना मृतांच्या या अस्थिकडे कित्येक महिने नातेवाईक आलेलेच नाहीत. सध्या 100पेक्षा ज्यास्त अस्थिकलश कैलास स्मशानभूमीत पडून आहेत. सहसा अंत्यसंस्कार झाल्यानंतर 15 दिवसात अस्थिकलश घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगण्यात येते. त्यानंतर ही एखादा अस्थिकलश राहिला तर त्या अस्थिकलशाला स्मशानभूमीचे कर्मचारी स्वतः नदीत विसर्जीत करतात. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेकदा संबंधितांच्या अस्थि नातेवाईक नेत नाहीत, कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईक या अस्थि नेत नसल्याचे पहायला मिळत आहे.
3 महिन्यापेक्षा अधिक काळ पडून
अनेक दिवस या अस्थि स्मशानभूमीमध्ये पडून राहतात, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचारी काही महिने वाट पाहतात. मात्र तीन महिने होऊनही कोणी येत नसल्याने आता हे कर्मचारी स्वतःच शंभर अस्थिंचे विसर्जन नदी करतात. कोरोना काळात आतापर्यत नातेवाईकांनी न नेलेल्या अशा 300पेक्षा ज्यास्त अस्थिचे या कर्मचाऱ्यांनी विसर्जन केल्याचे कर्मचारी सांगतात.
हेही वाचा-पीक विम्याचे अपयश लपवण्यासाठी सरकार लोकांची दिशाभूल करते - देवेंद्र फडणवीस