पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात कोरोनाने थैमान घातले असून शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 63 हजार 622 वर पोहोचली आहे. तर समाधानकारक बाब म्हणजे आत्तापर्यंत 50 हजार 41 जणांनी कोरोनावर मात केली असून हे सर्व जण ठणठणीत बरे झाले आहेत. आज देखील शहरात 1 हजार 38 जण कोरोना बाधित आढळले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची संबंधित आकडेवारी शहरातील आणि महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज हजारो नागरिक कोरोना बाधित आढळत आहेत. तर, दुसरीकडे शेकडो नागरिक कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होत आहे. शहरात आत्तापर्यंत 63 हजार 622 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 50 हजार 41 जण हे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक बरे होण्याचे प्रमाण कौतुकास्पद आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील 1 हजार 39 जणांचा मृत्यू देखील झाला आहे, हे विसरता येणार नाही. ग्रामीण भागातील मात्र महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 291 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. हे सर्व पाहता शहरातील नागरिकांनी करोना महामारीविषयी गांभीर्याने राहणे गरजेचे आहे. अत्यंत महत्वाचे काम असल्याच बाहेर पडावे, तोंडाला नियमित मास्क असणे गरजेचे आहे. सार्वजनिक रस्त्यांवर थुंकू नये, अशी माहिती वारंवार प्रशासनकडून दिली जात आहे. पण, शहरातील काही नागरीक मास्क वापरत नसल्याचे देखील पुढे आले आहे. यावर स्वतः पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मास्क न घालणाऱ्यांना दंड करण्यात आला आहे.
महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 616 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचा - 24 तासात वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने मलठण ग्रामस्थांनी मानले ऊर्जामंत्र्यांचे आभार