परभणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी परभणीत येत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी शहरात विद्युत खांबांवर भाजपचे झेंडे लावणारा तरुण विजेच्या तीव्र धक्क्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.
हेही वाचा - काँग्रेस करणार फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची पोलखोल
सय्यद नजमुद्दिन सय्यद असेफोद्दिन (वय २४ वर्षे, रा. राहुल नगर, परभणी) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दौरा परभणीत होत आहे. ते गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस परभणी जिल्ह्यात असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात भाजपचे झेंडे लावून भाजपमय वातावरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या रस्त्याच्या दुभाजकामध्ये असलेल्या खांबांवर भाजपचे झेंडे लावण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादी नावालाही उरली नाही - मुख्यमंत्री फडणवीस
सय्यद नावाचा तरुण खांबांवर झेंडे लावत असताना गणपती मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर असलेल्या खांबावरील विद्युत तारांमध्ये घर्षण झाले. यात सय्यद नजमुद्दिन याला विजेच्या तारांचा जोरदार धक्का बसला. शिवाय पेट्रोल पंपासमोर असलेल्या खांबावर मोठ्या प्रमाणात घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. त्यामुळे विजेचा स्फोटही झाला. यावेळी रस्त्यावरील आणि पेट्रोल पंपावरील नागरिक सैरावैरा पळू लागले. त्यात विजेचा मोठ्या प्रमाणात धक्का बसल्याने सय्यद नजमुद्दिन हा रस्त्यावर कोसळला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेची शहरात चर्चा होत असून एकच खळबळ उडाली आहे.