परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन केले जात आहे. ज्यामुळे प्रामुख्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. अशाच एका तरुण कापड व्यावसायिकाने आपला व्यवसाय ठप्प झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिंतूर शहरातील सटवाई मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. 38 वर्षीय कापड व्यवसायीक नारायण सदाशिव डोईफोडे असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय प्रशासनाकडून जोवर मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे काही काळ जिंतूरमध्ये तणाव निर्माण झाले होते.
लॉकडाऊनमुळे व्यवसाय करणे झाले कठिण
नारायण डोईफोडे हे ग्रामीण भागात जाऊन कापड व्यवसाय करत असत. मात्र वर्षभरापासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार कमी अधिक प्रमाणात बंद असल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. याच व्यवसायातून मिळणार्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय करणे कठीण झाले होते. लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे यावर्षीही व्यवसाय होत नसल्याने ते त्रस्त होते. यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे.
मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेमुळे तणाव
नारायण डोईफोडे यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. 'जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांनी घेतल्याने भूमिकेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलीस आणि महसूल प्रशासनाने या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेतला.
तर लॉकडाऊनमुळे इतरही व्यापारी चिंतेत
गेल्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 1 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र, काल (बुधवार) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी या लॉकडाऊनमध्ये 5 एप्रिलपर्यंत वाढ केल्याने सर्वसामान्य व्यापारी आणि कामगार वर्गाची चिंता वाढली आहे.
हेही वाचा-कोरोना वाढतोय! वाचा, राज्यातील टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्या सूचना