परभणी - जगातील ४ खंड आणि त्यातील ३५ देश फिरून मायदेशी परतलेल्या विष्णुदास चापके यांनी भारतासारखी आपुलकी आणि मित्रता जगात कुठेही नाही, असे म्हटले आहे. जगात फक्त व्यवसायिक मैत्री असल्याचे ते म्हणाले. आईची आणि घराची आठवण काढून भावूक झालेल्या विष्णुदास यांनी आता सात-आठ दिवस घरचे खाऊन मजा करणार असल्याचेही सांगितले.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या कातनेश्वर या त्यांच्या मूळ गावी जाण्यापूर्वी मंगळवारी दुपारी चापके यांनी परभणीतील पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी, परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे वडील शेषराव चापके, आई सुमनबाई, भाऊ सुदर्शन आणि नातेवाईक उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना विष्णुदास यांनी प्रवासातील अनुभव सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने, साहित्यिक आसाराम लोमटे, अभिमन्यू कांबळे, डॉ. धनाजी चव्हाण, गिरीराज भगत, गजानन देशमुख, नजीर खान आदी उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले विष्णुदास यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. त्यानंतर पूर्णा येथे दहावीची परीक्षा देऊन त्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये एम. ए. इंग्लिश ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यादरम्यान, त्यांनी मुंबई गाठली आणि दोन इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये काहीवर्षे काम केले. त्याचवेळी त्यांची कमांडर दिलीप धोंडे यांच्याशीही भेट झाली. धोंडे यांनी समुद्रमार्गे केलेल्या जगभ्रमंतीची प्रेरणा घेऊन विष्णुदास यांनी जमीनमार्गे जगभ्रमंती करण्याचे निश्चित केले. त्यानुसार १९ मार्च २०१६ रोजी त्यांनी ठाण्यातून प्रवासाला सुरुवात केली. कोलकात्यातून थायलंड येथे ते सर्वप्रथम गेले, शेवटी इराणचा प्रवास करून ते भारतात परतले.
प्रवासात आलेले कटू-गोड अनुभव त्यांनी सांगितले. त्यांनी प्रामुख्याने भारतात असलेली आपुलकी, मैत्रीचे नाते जगात कुठेही नसल्याचे सांगितले. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो काढून त्याला किती लाईक मिळू शकतात, हे पाहून त्या व्यक्तीसोबत मैत्री करणाऱ्यांची संख्या विदेशात अधिक आहे. ते केवळ व्यवसायिक मैत्री करतात. मुलगा १८ वर्षाचा होताच त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले जाते, तेव्हा त्याच्यात भावना कुठून येणार ? ती येणारच नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे विदेशात भावनिक संबंध आणि मैत्रीची भावना फार कमी राहिली आहे. याशिवाय शाकाहारी लोक फक्त भारतात आहेत. तर संपूर्ण जगात मांसाहार घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आई आणि घरच्या आठवणीने भाऊक झालेल्या विष्णुदास यांनी आता काही दिवस घरी राहणार असल्याचे सांगितले. सात-आठ दिवस घरचे खाऊन मजा करणार आहे. मित्रांना घरी भेटायला जाणार असून मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासाच्या अनुभवावर आधारित पुस्तक काढून येणाऱ्या काळात पर्यावरणावर काम करण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच स्वतःला सिंचन क्षेत्राशी निगडीत कामात गुंतवणार असल्याचेही ते म्हणाले.
"मदत करणाऱ्यांची परतफेड करणार"
या प्रवासादरम्यान मला अनेक मित्र-मैत्रिणींनी सहकार्य केले. त्यांनी केलेली मदत ही अनमोल आहे, त्याचे मोल करता येणार नाही. या लोकांना मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करून त्यांची परतफेड करणार आहे. काही मध्यमवर्गीय व गरीब मित्रांनीदेखील मला मदत केली आहे. माझ्याकडे आलेल्या मदतीतून काही रक्कम शिल्लक राहिली आहे. ती रक्कम माझ्या मित्रांना परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.