परभणी- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी कृषी महाविद्यालयातील सभागृहात महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (३ जानेवारी) सकाळी ११ वाजता परभणी कृषी महाविद्यालयातील सभागृहात महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला राठोड यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. देवसिंगा (तुळजापुर, जि उस्मानाबाद) येथील विजयालक्ष्मी सखी प्रो़डयुसर कंपनीच्या अध्यक्षा अर्चना भोसले या प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ.अशोक ढवण हे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषवतील. त्याचबरोबर खासदार संजय (बंडू) जाधव, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी (बाबाजानी), विप्लव बाजोरिया, आमदार डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपूडकर, मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे, महापौर अनिता सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्त्रज्ञ महिला शेतकऱ्यांना उपयुक्त कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विस्तार संचालक डॉ. देवराव देवसरकर, प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.