परभणी - महाविकास आघाडी सरकारची निर्मिती झाल्यापासून परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेसशी नेहमीच खटके उडत आहेत. आता त्यांच्या संबंधाने आणखी एक नवा वाद राष्ट्रवादीकडून निर्माण करण्यात आला आहे. 'खासदार जाधव यांच्यावर पदाचा गैरवापर करत अतिरिक्त जमिनीचा फेर ओढण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचा हा आरोप आहे. आता या प्रकरणी कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी केली आहे.
खासदार-राष्ट्रवादीचा वाद विकोपाला -
मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी यांचा वाद विकोपाला गेला आहे. या वादाची सुरुवात खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांना बदला म्हणून मागणी केल्यापासून मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबजानी 'खासदार बदला, जिल्हा बदलेले' अशी मागणी केली होती. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जिंतूर बाजार समितीवर प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यावरून खासदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर नुकत्याच परभणीच्या जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल यांची झालेली नियुक्ती खासदारांकडून प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर भाजप खासदारांचे लोकसभेतील मौन दुर्दैवी, अशोक चव्हाणांची टीका
भुजबळांविषयीच्या वक्तव्यावर पडदा टाकायचा प्रयत्न -
दरम्यान, जिल्हाधिकारी गोयल प्रकरणाची कबुली देत खासदार जाधव यांनी जालना जिल्ह्यातील एका कार्यक्रमात 'राष्ट्रवादीला गाडू', असा इशारा दिला. शिवाय या भाषणाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर एका मुलाखतीत खासदार जाधव यांनी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.
'खासदारांनी राजकीय संन्यास घ्यावा'
विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील याच कार्यक्रमात खासदार जाधव यांनी 'आपण चुकीचे काम करत नाही, तसे असेल तर पुरावे द्यावेत, मी राजकीय संन्यास घेईल' असे देखील वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला धरूनच राष्ट्रवादीकडून खासदारांचे हे जमीन प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. सोबतच आता 'खासदारांनी राजकीय संन्यास घ्यावा' अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार संतोष देशमुख यांच्या सोबत "ईटीव्ही भारत" चे प्रतिनिधी गिरीराज भगत यांनी चर्चा करून नेमकं हे प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमके काय आहे, हे जमिनीचे प्रकरण -
परभणी शहरातील सर्वे नंबर 40 व 52 येथील श्रीनिवास अजमेरा यांनी प्लॉट नंबर 92 हा खरेदी केला आहे. मात्र, मुळ क्षेत्र कमी असताना खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या कार्यालयात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना बोलावून जास्त क्षेत्राचा (ओपन स्पेस) फेर लावण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे याबाबत तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले असता, त्यांनी आपल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चुकीचा फेर केल्याबद्दल निलंबीत का करण्यात येऊ नये, अशी नोटीस त्यांना उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांनी बजावली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या जमिनीचा हा वाद आहे, त्याच भागात खासदार संजय जाधव यांचा राहता बंगला आहे.
हेही वाचा - नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय दुर्घटना, ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांना २४ लाखांचा दंड