परभणी - देशात भाजपची आणि राज्यात युतीची लाट असली तरी परभणी आणि पाथरीतील युतीचे दोन्ही विद्यमान आमदार आपला गड राखण्यासाठी अधिकची मेहनत घेत आहेत. या मतदारसंघांमध्ये 2014 ची परिस्थिती राहिलेली नाही. यावेळची राजकीय गणिते वेगळी असून या दोन्ही उमेदवारांना विरोधकांसोबतच स्वकीयांचाही सामना करावा लागत आहे.
त्यामुळे परभणीत डॉ. राहुल पाटील आणि पाथरीत मोहन फड हे सेना-भाजपचे विद्यमान आमदार परिस्थितीशी कशा पध्दतीने दोन हात करून विजयाचा झेंडा फडकवू शकतील ? हे येणाऱ्या 24 तारखेला स्पष्ट होणार आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघांमध्ये सेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी 2014 ला स्वतंत्र लढून सुद्धा एमआयएमच्या उमेदवारावर सुमारे 27 हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. त्यावेळी आमदार पाटील यांच्यापुढे एमआयएमचा तगडा उमेदवार रिंगणात उतरला होता. मात्र, हिंदुत्ववादी मतांची विभागणी करण्यासाठी भाजपचे आनंद भरोसे हे ही निवडणुकीच्या रिंगणात होते, असे असताना पाटलांनी त्या निवडणुकीत बाजी मारली होती. त्यावेळी त्यांना पक्षातूनही भक्कम साथ होती. परंतु, यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दुराव्याचा प्रभाव दिसून येत आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून दुसरा गट आमदार राहुल पाटील यांना किती मदत करतो, यावर त्यांचे मताधिक्य अवलंबून आहे.
हेही वाचा - पालम शहरात कोळसा भरलेला ट्रक जळून खाक; जीवितहानी नाही
तर मागच्यावेळी विरोधात उभे राहणारे भाजपचे आनंद भरोसे यावेळी मात्र त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करत आहेत. त्याचा फायदा त्यांना निश्चित होईल. दरम्यान, या निवडणुकीत आमदार पाटील यांचा प्रत्यक्ष सामना काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्यासोबत होत आहे. नागरे यांना सेनेच्या एका गटाचा पाठिंबा असून, काँग्रेसचा देखील एक गट त्यांच्यासोबत कार्यरत आहे. परंतु, नागरेंची मते खाण्यासाठी काँग्रेसचे रविराज देशमुख तर 'एमआयएम'चे आली खान हे प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा परिणाम दिसून येणार आहे. आमदार पाटील या परिस्थितीवर कशी मात करतात, ते येणाऱ्या 24 तारखेला स्पष्ट होईल.
तर दुसरीकडे पाथरीचे भाजपचे सहयोगी तथा अपक्ष विद्यमान आमदार मोहन फड यांच्यापुढे 2014 ला हीच परिस्थिती होती. सेना,भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते. त्यावेळी शिवसेनेचा फारसा प्रभाव राहिला नव्हता, तर दुसरीकडे राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने दोन दिवस आधी काँग्रेसमध्ये येऊन उमेदवारी मिळवणाऱ्या सुरेश वरपुडकर यांनी मोहन फड यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, त्यांनाही मात देत मोहन फड यांनी सुमारे साडेतेरा हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात उभे होते. त्यामुळे त्यांना ती निवडणूक जड गेली. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. शिवसेना त्यांच्यासोबत आहे.
हेही वाचा - परभणीतील उपमहापौरांच्या घरी पोलिसांची छापा; मतदारांना पैसे वाटण्याचा होता संशय
शिवाय शिवसेनेच्या वाट्यातील हा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा लावून भाजपकडे घेतला. त्यामुळे त्यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे, असे असले तरी देखील शिवसेनेचे बंडखोर डॉ. जगदीश शिंदे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांचा सामना फड यांना करावा लागणार आहे. परंतु, शिवसेनेत नवखे असलेले डॉ. शिंदे यांचा प्रभाव निवडणुकीत किती पडेल? हा संशोधनाचाच विषय आहे. तर मोहन फड यांची मुख्य लढत होत असलेल्या काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांच्या मतांची विभागणी करण्यासाठी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शेतकरी चेहरा असलेल्या विलास बाबर यांनी शेतकऱ्यांच्या विमाप्रश्नी थेट दिल्लीपर्यंत धडक मारलेली आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मतांची अपेक्षा आहे. त्यांच्या मतांवर विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवलंबून आहे. मोहन फड यांना ही निवडणूक सोपी वाटत असली तरी येणार्या दोन दिवसात काय हालचाली होतात, यावरून त्यांच्या विजयाचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे.