परभणी - शहरात तुराबुल हक्क यात्रा सुरळीत पार पडली. मात्र, सोमवारी रात्री यात्रेतील एका व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे व्यापारी कुलुपांच्या किल्लीसाठी वापरण्यात येणारे किचनचे दुकान थाटून बसले होते. त्याच्याआडून ते शस्त्र विकण्याचा धंदा करत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
परभणी शहराच्या पश्चिमेस असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात उरूस यात्रा भरवण्यात येते. 15 फेब्रुवारीला या यात्रे सांगता होत असते. परंतु, यात्रेकरूंचा ओघ सुरू असल्याने अजूनही या ठिकाणी अनेक दुकाने आहेत. यातील एका दुकानदाराकडे धारदार, तीक्ष्ण शास्त्र असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राग सुधा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पूजा भोरगे, गजेंद्र चव्हाण यांचे पथक तयार करून सोमवारी रात्री 10 वाजता सदर दुकानदारावर छापा मारण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - सेलू तालुक्यात 8 वर्षीय बलिकेवर अत्याचार ; आरोपी फरार
या छाप्यात पोलिसांनी शेख अजीम शेख अकबर, शेख रहीम शेख अकबर, सय्यद फिरोज सय्यद रजा आणि सलमान पठाण फय्याज पठाण (सर्व रा. औरंगाबाद) यांची आणि त्यांच्या दुकानाची झडती घेतली. त्यात 5 गुप्त्या, 1 मोठे लोखंडी खंजीर, 5 लहान खंजीर, 8 लहान खंजीर, 1 मोठा लोखंडी चाकू, 2 लहान चाकू, 8 धारदार चाकू असे एकूण 30 तीक्ष्ण आणि धारदार शस्त्रं मिळून आली. एखाद्या मनुष्याचा जीव जाईल, असे हे घातक शस्त्र असून त्याची किंमत 10 हजार रुपये आहे. हे सर्व शस्त्र जप्त करत पोलिसांनी आरोपींचे मोबाईल आणि इतर काही साहित्य देखील जप्त केले आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्यांच्यावर जगदीश रेड्डी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - 'विभागीय आयुक्तांच्या कान उघडणीनंतर नळजोडणीचे दर कमी'