परभणी - परभणी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एका कर्मचाऱ्यासाठी बोटाला लावण्यात येणारी शाई डोकेदुखी ठरली आहे. त्या कर्मचाऱ्याच्या बोटावर या शाईमधील केमिकलचा प्रादुर्भाव होवून बोटांची ठणक वाढली आहे. स्थानिक डॉक्टरांना दाखवून त्रास कमी होत नसल्याने त्यांनी आज परभणीच्या त्वचारोग तज्ञाकडे धाव घेतली आहे.
परभणी लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिलला मतदान घेण्यात आले. यावेळी जिंतूर तालुक्यातील बलसा मतदार केंद्र येथे सेवा बजावणारे दत्तराव राऊत यांना या शाईचा प्रादुर्भाव झाला आहे. ते याठिकाणी सहाय्यक केंद्र प्रमुख म्हणून काम पाहू लागले. मतदान करण्यापूर्वी प्रत्येकाच्या बोटाला शाई लावण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यानुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी हे काम प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र हे काम करत असताना बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचे वगळ त्यांच्या बोटांवर येत होते. त्यामुळे उजव्या हाताचे तिनेही बोट त्या शाईने रंगून गेले. काम करत असताना त्यांना लक्षात आले नाही, परंतु रात्री घरी गेल्यावर त्यांचे बोट दुखु लागली होती. जिंतूरच्या स्थानिक डॉक्टरांना हा प्रकार दाखवला, त्यांनी तात्पुरते औषधे दिली परंतु त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी आज परभणीतील त्वचारोग तज्ञ डॉ. जोगड यांना हा प्रकार दाखवला, जोगड यांनी शाई मधील केमिकलमुळे हा प्रकार झाला असून, थोड्या दिवसात त्रास कमी होईल, असे सांगितल्याने दत्तराव राऊत यांचे समाधान झाले. दरम्यान, ईव्हीएम मशिनबाबत यापूर्वी अनेकदा प्रश्न निर्माण झाले. आता या शाईच्या बाबतीतही प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात या शाईला देखील पर्याय देण्याची मागणी झाल्यास नवल वाटायला नको.