परभणी - विकासाची दृष्टी केवळ भाजपकडेच असून बाकीच्यांना विकासाच काही देणं-घेणं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी विकास करूच शकत नाहीत. कारण जेव्हा देशात संकट उभे होते, तेव्हा राहुल गांधी परदेशात पळून गेले, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. जिंतूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या सेलू येथे भाजपच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या सभेपासून त्यांनी महाराष्ट्रातील प्रचार सुरू केला आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर, सुरेश भुमरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आदित्यनाथ म्हणाले, सौभाग्य, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री घरकुल आदी योजनांमुळे समाजातील प्रत्येक घटक हा विकासात सहभागी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी देशाचा विकास हा जाती-धर्मापुरताच मर्यादित असल्याचे सांगून आता समाजातील सर्व घटक यात सहभागी झाला असल्याचे ते म्हणाले. तसेच, देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे सूत्र कायम राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय मोदींनी देशातील 10 करोड जनतेला शौचालय दिले. आता देशातील प्रत्येक जनतेला स्वछ पाणी देण्याचा मोदींचा संकल्प असून तो लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'राफेल' पुढे ठेवलेल्या लिंबू वरून ओवैसींनी परभणीत उडवली भाजप-सेनेची टर
काँग्रेसच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगात 11 व्या क्रमांकावर होती. तिने आता पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. आगामी काळात ती जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल. त्यामुळे प्रत्येकांच्या उत्त्पन्नात दुप्पट वाढ होणार असून युवकांना रोजगार व महिलांचे सशक्तीकरण होण्यास मोठी मदत मिळेल. मोदींनी बेटी बचाव बेटी पढाव चा नारा दिला आणि ट्रिपल तलाकचा कडक कायदा करून देशातील मुस्लीम महिलांना अनेक वर्षांपासून जो त्रास होता, त्या त्रासापासून त्यांना मुक्त केले. बोकाळलेला आतंकवाद आज खुप कमी झाला आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' मोदीच करून दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक आमदारांंवर केली टीका
गावा-गावात पक्के रस्ते झाले तर विकासाची गती वाढेल. केंद्र व राज्य शासनाने यावरच आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिंतूरमधून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे या भागाचा विकास साधला जाणार असला तरी स्थनिक आमदारांनी या रस्त्याच्या कामाला गती देण्याऐवजी खोळंबा निर्माण झाला आहे. नवीन काम सोडा परंतु, चालू कामात खोळंबा निर्माण करणारे लोकप्रतिनिधी काय विकास करणार, अशी टीका त्यांनी 'राष्ट्रवादी'चे स्थानिक आमदार विजय भांबळे यांचे नाव न घेता केली.