परभणी - उद्या (मंगळवार)पासून पुढील चार दिवस मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र सेवा केंद्राने याबाबतची शक्यता वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत आहे. मात्र, पुढील 4 दिवस बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रविवारपासूनच वातावरण बदण्यास सुरुवात -
परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. रविवारी 40.5 अंश सेल्सिअस तर सोमवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्या लॉकडाऊन असल्याने रस्ते ओस पडले आहेत. तापमानातील बदलामुळे सायंकाळच्या वेळेला वारे वाहू लागले आहेत. हा बदल रविवारपासूनच जाणवत आहे. सोमवारी सायंकाळी देखील सोसाट्याचा वारा वाहत होता.
'या' जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस -
मराठवाड्यातील परभणीसह बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेगही जास्त राहणार असल्याचे कृषी हवामानशास्त्र सेवा केंद्राने म्हटले आहे.
फळपिकांचे नुकसान होण्याची शक्यता -
पुढील 4 दिवस वातावरणात होणाऱ्या बदलाअंतर्गत हवामान विभागाने वाऱ्याचा वेग जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे. आंबा, पपई, चिकू, मोसंबी, संत्रा आदी पिकांना या वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा - हे शिमला-मनाली नव्हे तर आपलं कोल्हापूर; अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस अन् बर्फवृष्टी