परभणी - जिल्ह्यात सोमवारपासून (दि. 6 सप्टेंबर) मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे दुधडी भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. सेलू तालुक्यातील अशाच एका नाल्याला आलेल्या पुरात दोन तरुणांनी वाहत्या पाण्यात उड्या मारून स्टंटबाजी केली. ही स्टंटबाजी त्यांच्या जीवावर बेतली असती. तसेच गंगाखेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या पुरात ऐन पोळ्याच्या दिवशीच एक शेतकरी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान, पावसाळा संपायला अजून एक महिना शिल्लक असताना परभणी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 127.5 टक्के पाऊस झाला आहे. जूनच्या सुरुवातीला जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जुलै महिना कोरडा गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, आता गेल्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यात सोमवारपासून आणखी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात परभणी जिल्ह्यात सुमारे 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
इंद्रायणी नदीच्या पुरात शेतकरी वाहून गेला
सोमवारी सकाळपासून परभणीत मुसळधार पाऊस पडत असून इंद्रायणी, दुधना, पूर्णा, इंद्रायणी आदी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने या नद्यांना पूर आला आहे. त्यानुसार गंगाखेड तालुक्यातील इंद्रायणी नदीलाही पूर आला असून, यामध्ये सोमवारी दुपारनंतर एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुधाकर शेषराव सूर्यवंशी (वय 45 वर्षे, रा. सायला सुनेगाव), असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पोळ्याचे साहित्य आणण्यासाठी ते गंगाखेडकडे निघाले होते. मात्र, वाटेत इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात ते वाहून गेले. घटनास्थळी पोलीस, तलाठी, ग्रामसेवक आदींसह गावकऱ्यांनी धाव घेतली असून, वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध अजून सुरू आहे. आज (मंगळवारी) दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध लागलेला नाही.
दोन तरुणांची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी
सेलू तालुक्यातील कुपटा गावाला जोडणाऱ्या पुलावरून सोमवारपासून पाणी वाहत आहे. विशेष म्हणजे या पावसाळ्यात चार वेळा हा पूल पाण्याखाली गेला असून, तो मोडकळीस आला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी दोन युवकांनी या पुऱ्याच्या पाण्यात गावकऱ्यांसमोर उडी घेत स्टंटबाजी केली. ही स्टंटबाजी या युवकांच्या जीवावर ही बेतली असती. महत्त्वाचे म्हणजे तरुणांना रोखण्याऐवजी गावातील इतर तरुण प्रोत्साहन देत असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांवर लक्ष ठेवून स्टंटबाजी करणाऱ्या युवकांना वेळीच आवरण्यासाठी उपयोजना करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा - लेंडी, गळाटी नद्यांना पूर; 12 गावांचा तुटला संपर्क , बैलजोडी गेली वाहून