परभणी - जिल्ह्यात पावसाअभावी वृक्षारोपण करणे, रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे अवघड झालेले आहे. यातच दुसरीकडे शहरातील सुमारे तीस वर्ष जुने दोन वृक्ष कोसळल्याची घटना शहरात घडली आहे. यातील एक झाड जायकवाडी परिसरात तर दुसरे झाड रेल्वे स्थानका पुढील जीएसटी भवन समोरच्या रस्त्यावर उन्मळून पडले. यामुळे दोन्ही भागात वाहतूक कोंडी झाली होती.
परभणीच्या रेल्वे स्थानकासमोरील वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या संरक्षण भिंतीला लागून एक जुने वडाचे झाड होते. हे झाड शनिवारी पहाटे रस्त्यावर उन्मळून पडले. यामुळे स्थानक रोड परिसरातील वाहतूक सकाळी 10 वाजेपर्यंत खोळंबली होती. मध्यरात्री शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे स्थानक रस्त्यावरील हे झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे पहाटेपासूनच या मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर कोसळलेले हे झाड बाजूला केले. साधारणतः पंचवीस ते तीस वर्ष जुने झाड पडल्याने झाडांच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, शुक्रवारी देखील शहरातील जायकवाडी भागात एक झाड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत एक महिला सुदैवाने बचावली. देशमुख हॉटेल परिसरातून सुपर मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर जायकवाडी वसाहत आहे. या वसाहतीच्या संरक्षण भिंतीलगत असलेले एक झाड शुक्रवारी सकाळी अचानक मुळापासून उन्मळून पडले. याच वेळी स्कुटीने एक महिला या रस्त्याने जात होती. मात्र, झाड खाली पडत असल्याचे लक्षात येताच या महिलेने स्कुटी जागीच सोडून स्वत:चा बचाव केला. यामुळे ही महिला बचावली. गुरुवारी शहरात दिवसभर वीजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने हे झाड कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
जुन्या वृक्षांच्या संवर्धनाची गरज