परभणी - परभणी जिल्ह्यात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण काल (गुरुवारी) आढळून आले होते. मात्र, आज (शुक्रवारी) त्याहूनही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 842 कोरोनाबधितांची भर पडली असून, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक परभणीत दाखल झाले असून, या पथकाने परभणी जिल्हा रुग्णालयासह शहरातील कोरोना हॉस्पिटलला भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने शहरासह जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. काल गुरुवार पाठोपाठ आज शुक्रवारी देखील कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 842 रुग्ण आढळून आले आहेत, तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासाजनक बाब म्हणजे 392 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 4 हजार 223 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 19 हजार 501 वर पोहोचला आहे. त्यापैकी 14 हजार 783 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 495 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 4 हजार 223 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या निदानासाठी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1 लाख 93 हजार 655 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय पथक परभणीत दाखल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह, उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेण्यास सुरवात केली आहे. या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील कोविड हॉस्पिटल व लसीकरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. केंद्राचे दोन सदस्यीय पथक काल गुरुवारीच परभणीत दाखल झाले आहे. यात पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ.दिनेश बाबू व नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ.रंजन सोळंकी यांचा समावेश आहे. त्यांनी कालच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करून प्राथमिक माहिती घेतली.
केंद्रीय पथकाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा
त्यांनतर आज (शुक्रवारी) जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरसह व्हॅक्सिनेशन सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांना देण्यात येणार्या सोयीसुविधा, उपचार याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर लसीकरण केंद्राला भेटी देत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याशिवाय पाथरी रस्त्यावरील डॉ.प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन, या ठिकाणच्या लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मुगळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, डॉ. किशोर सुरवसे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - नागपूरात 55 हजार को-वॅक्सिनचा साठा दाखल; बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू