परभणी - वाघ आल्याच्या चर्चेमुळे सेलू तालुक्यातील साळेगाव, रायपूर, हातनूर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) वनविभागाचे पथक वाघाच्या पावलांचे ठसे घेण्यासाठी सेलूत दाखल होणार आहे. त्यानंतरच तो वाघ आहे, की अफवा हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - परळीत महाविकास आघाडीचा राज्यातील पहिला विजय; धनंजय मुंडें गटाने सिरसाळा ग्रा. प. निवडणूकीत मारली बाजी
सेलू शिवारात वाघ दिसल्याची चर्चा सोमवारी रात्रीच्या सुमारास सुरू झाली. साळेगावच्या काही लोकांना पट्टेदार वाघ दिसल्याने धक्का बसला. त्यांनी मोटारसायकलवरून रायपूर गाव गाठले. तसेच रात्री उशीरा आमदार मेघना बोर्डीकर आणि तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी या भागात वाघाचा शोध घेतला. मात्र, परिसरात अंधार असल्याने तो वाघ आहे की अन्य काही, हे समजू शकले नाही. या वाघाच्या चर्चेमुळे साळेगाव, रायपूर, हातनूर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी सेनगाव (जि.हिंगोली) शिवारात वाघ असल्याला वनविभागाने दुजोरा दिला असल्याने अन्नाच्या शोधात वाघ आता या परिसरात आला असावा, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, आज मंगळवारी दुपारपर्यंत वनविभागाचे पथक वाघाच्या पावलांचे ठसे घेण्यासाठी परिसरात येणार आहे. त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत हा नेमका वाघच आहे की दुसरा कुठला प्राणी हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी या परिसरात भीतियुक्त वातावरण तयार झाले आहे.
हेही वाचा - उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका; जन्मठेप कायम
अहवालानंतरच सत्य समोर येईल -
काही दिवसांपासून तालुक्यातील वाई, बोथी, निरवाडी आणि चारठाणा या परिसरातील शेतकऱ्यांनी देखील परिसरात वाघ दिसल्याची माहिती दिली होती. या माहितीनुसार हा वाघ या शिवारात भ्रमण करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु वनविभागाच्या ठसे तज्ज्ञांच्या अहवालानुसार हा प्राणी नेमका कोणता ? हे समजू शकेल, अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली आहे.