परभणी - शहरातील २ तरुणांचा तर, जिंतूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा मंगळवारी मृत्यू झाला. यामध्ये एकाचा पाय घसरून, तर अन्य २ घटनांमध्ये एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली तर, दुसऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
शहरातील खानापूर फाटा येथील रहिवासी नंदकुमार संदीपराव शिंदे (वय ३४) यांनी मध्यरात्री २ वाजता राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर खानापूर फाटा परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. नंदू शिंदे यांची आई आजारी होती. यामुळे त्यांना नैराश्य आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शहरातीलच ममता कॉलनी येथील रहिवासी बबरू डुकरे (वय ४५) यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. बबरू डुकरे यांची आई गंभीर आजारी असल्याने तिला दवाखान्यात नेत असतानाच बबरू यांना ह्दयविकाराचा झटका आला.
जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका तरुण शेतकऱ्याचा बोरवेलचे काम करत असताना विहिरीत तोल गेला. अशोक विश्वनाथ जगताप (वय ३८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो बलसा येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतील आडव्या बोरवेल मशिनचे काम करत होता. तेव्हा तो ५० फूट खाली विहिरीत पडला. यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याला दुपारी जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ व एक वर्षाचा मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.