परभणी - जिंतूर शहरात मध्यरात्री एक हॉटेल आणि दोन घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड आणि दाग-दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत.
जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळी गल्ली येथील रहिवाशी राजाभाऊ शिंदे हे आपल्या गावाकडे गेले होते. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या बाजूने शिडी लावून आत प्रवेश केला. घरातील वीस हजार रुपये रोख व दागिने चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार सकाळी शिंदे परत आल्यानंतर उघडकीस आला.
हेही वाचा - जळगावात भाजपकडून स्वबळाची तयारी; सेनेच्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा
दुसरी चोरी नगरसेवक शेख शोएब जानीमियाँ यांच्या हॉटेलमध्ये झाली. रात्री मागच्या भिंतीवरून आत प्रवेश करत गल्ल्यात ठेवलेली सहा हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली. तसेच मेवाती मोहल्ला येथील शेख कलीम शेख सलीम यांच्या घरातूनसुद्धा चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने असा एक लाखांपेक्षा जास्तीची ऐवज लंपास केला.
राजाभाऊ शिंदे व शेख कलीम यांनी अज्ञात चोरांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. याबाबत पोलीस तपास सुरू केला आहे. एकाच रात्री तीन चोऱ्या झाल्याने जिंतूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.