परभणी - जिंतूर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील औद्योगिक वसाहतीत विजेचा शॉक लागल्याने एका वाहनाच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तर बामणी येथे येलदरी जलाशयाजवळ पाण्यात बुडून गुराख्याचा मृत्यू झाला असून तिसऱ्या घटनेत आडगाव बाजार येथे विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. या तीनही प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
पहिल्या घटनेत जिंतूर येथील औद्योगिक वसाहतीत मध्यप्रदेशातील वाहन घेऊन आलेल्या वाहनातील क्लिनर संदीप विक्रम सिंग सेंधवा हा गाडीतील ताडपत्री काढत असताना त्याला विजेचा शॉक लागला. त्याला जिंतूर शासकीय रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणात पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत जिंतूर तालुक्यातील बामणी येथील गुरे राखणारा प्रल्हाद सुदाम वाकळे (38) हा नेहमीप्रमाणे येलदरी जलाशयाजवळ जनावरे चारत होता. त्यावेळी एक म्हैस जलाशयाकडे जात होती, तिचा पाठलाग करताना जलाशयात बुडून सुदामचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोन ते तीन तासानंतर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक काशीकर आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जिंतूर शासकीय रुग्णालयात हलवले. याथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली, असे कुटुंब आहे. याप्रकरणीही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तिसऱ्या घटनेत आडगाव बाजार येथील एक विवाहिता मीनाक्षी प्रमोद दाभाडे (22) यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात 15 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. या महिलेचा मृत्यू कशाने झाला? याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या महिलेस दीड वर्षांची एक मुलगी आहे. मात्र जिंतूर शासकीय रुग्णालयात मीनाक्षीच्या नातेवाइकांनी मंगळवारी एकच गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण दिसत होते. या प्रकरणात जिंतूर पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.