परभणी - केंद्र शासनाने अचानक घेतलेल्या पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीमुळे मूर्तिकारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात लागणाऱ्या मूर्ती बनवणाऱ्या व्यवसायिकांची 80 टक्के तयारी झाली आहे. असे असताना केंद्राने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असून, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने करू नये, अन्यथा मूर्तिकारांवर कर्जबाजारीपणाची वेळ येईल, अशी भावना परभणीच्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात परभणीच्या मूर्तिकार संघटनेकडून खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना निवेदन देखील देण्यात आले. संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करून त्याची कडक अंमलबजावणी केली. त्यातच केंद्रीय प्रदूषण महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती बनविण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील अंदाजे २० लाखाच्यावर गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या मूर्तिकार व कारागिरांवर होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर गरिब, भूमिहीन तसेच अपुरे शिक्षण आणि पुरेसे भांडवल नसणारे कारागीर अडचणीत येणार आहेत. आधीच आधुनिक कौशल्याच्या अभावामुळे सततच्या आर्थिक टंचाईचा सामना कारागीर करतो. त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साधारण प्रत्येक वर्षी येणाऱ्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवसाठी लहानमोठ्या मूर्ती बनवून आपल्या पोटाची खळगी भरतो. येत्या २२ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्याच्या तयारीसाठी सर्व मूर्तिकार ७ ते ८ महिने अगोदर तयारीला लागतात. बऱ्याच मूर्तीकरांची लाखों रुपयांची गुंतावणूक या व्यवसायात झाली आहे. बऱ्याच मूर्तीकारांनी बँक व खासगी सावकारांकडून कर्ज काढलेले आहे. त्यांच्यावर अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे मूर्तिकार व्यावसायिक हवालदिल झाला आहे. कारण लाखों रुपये गुंतवून बनविलेल्या गणेशमूर्तीची या वर्षी विक्री झाली नाही, तर मूर्तिकारांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट येऊन त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होतील. महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत श्रद्धेने व भावनिकतेने साजरा केला जातो.
महाराष्ट्राबाहेरील केंद्रीय प्रदूषण महामंडळाला याची कल्पना नाही. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील प्रामाणिक आणि कष्टकरी मूर्तिकारांचा प्राधान्याने विचार करावा व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीमधील प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील कायमस्वरूपी बंदीची अमलबजावणी महाराष्ट्र राज्यात निदान यावर्षी तरी करू नये, अशी येथील मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष विशाल रिठे, ज्ञानेश्वर बनचर, प्रकाश साडेगावकर, विनायक मिसाळ, मनोहर बनचर, सुभाष सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चिरके, गजानन टोलमारे, पंकज यंदे, गणेश पिंपरे, महेश यनदे, प्रकाश जोरूळे, बालाजी परडे, मोतिराम परडे, रेवण परडे आदींनी आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.