परभणी - जिल्ह्यातील एकमात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्या रुग्णाच्या घरातील ९ नातेवाईकांचा दुसरा स्वॅब अहवालसुद्धा निगेटिव्ह आला आहे. सोबतच दिल्ली-निजामुद्दीन प्रकरणातील 17 तबलिगी भाविकांच्या दुसऱ्या स्वॅबचा अहवालदेखील निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्यातरी परभणी जिल्हा सेफझोनमध्ये दिसून येत आहे. सध्या शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या जिल्ह्यात जनता संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना विषयक बैठक पार पडली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह बांधकाम, महावितरण, पोलीस, कृषी विद्यापीठ आदी विभागातील 'कोरोना' नोडल अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोना विषयक आजपर्यतचा सर्वांगीन आढावा घेण्यात आला. तसेच कोरोना विषयक भविष्यात करायच्या उपाययोजनाबाबत निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील एकमात्र पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्या रुग्णांच्या घरातील एकूण ९ नातेसंबंधातील व्यक्तींचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तसेच दिल्ली निजामुद्दीन प्रकरणातील एकूण १७ व्यक्तींचा दुसरा स्वॅब अहवालदेखील निगेटिव्ह आला आहे.
गुरुवारी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी जिल्हा रुग्णालयात १८ संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत. आजपर्यंत एकूण ५९३ संभाव्य रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली असून त्यापैकी केवळ 1 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. सध्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 21 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय विलगीकरण केलेले रुग्ण 289 होते, त्यातील 283 रुग्णांनी आपला विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे. यामध्ये 62 रुग्ण परदेशातून आलेले आणि सहा जण त्यांच्या संपर्कातील होते. गुरुवारी 47 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्व निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.