परभणी - वारंवार कळवून देखील जिल्ह्यातील हमदापूर ते रामेटाकळी या रस्त्यावरील नाल्याच्या पुलाचे काम होत नसल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 27 नोव्हेंबर) जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून संताप व्यक्त केला. तो पुल पडल्यामुळे नाल्याचे पाणी सभोवतालच्या दहा शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये शिरून शेतीचे नुकसान होत आहे. मात्र, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगितले.
परभणी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेेच्या वतीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. ज्यामध्ये हमदापूर ते रामेटाकळी या रस्त्यातील एका नाल्यावरील पडलेल्या पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. या पुलामुळे पाणी सभोवतालच्या शेतांमध्ये पाणी शिरत असल्याने शेतीचेही मोठ्याप्रणाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील आठ ते दहा शेतकऱ्यांचे 20 गुंठे शेत पाण्याने वाहुन गेले आहे. त्यामुळे या नुकसानीचा मोबदला तत्काळ मिळावा. तसेच पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पुन्हा निवेदन देण्यासाठी गेले असता, मुख्य कार्यकारी अभियंता नितीन अंभोरे हे कार्यालयात गैरहजर होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता. मात्र, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजस्तव त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला.
'यापूर्वीच दिला होता इशारा, तरीही दुर्लक्ष'
विशेष म्हणजे यापूर्वीच पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली होती. तसेच मुख्य कार्यकारी अभियंता नितीन अंभोरे यांच्याशी देखील फोनवर चर्चा करण्यात आली होती. पण, काहीच मार्ग निघाला नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी हा निकृष्ट पूल दुरुस्त करून दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. तरी देखील अजूनही मार्ग न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अभियंत्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून संताप व्यक्त केला.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय विरोधकांना झोपच येत नाही'