परभणी- गेले अनेक वर्षे एका विचाराने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या नेत्यांची मुले आपल्या सत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्यांच्या (भाजपच्या) दारात मुजरा करायला लावत आहेत. असे वंशाचे दिवे काय कामाचे? अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवारी) परभणीच्या जिंतुरात पक्ष सोडून गेलेल्या राज्यातील काही नेत्यांच्या मुलांवर केली.
भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली असून, भाजपत सर्वात जास्त भ्रष्ट मंत्री आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नसून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास देखील सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रेनिमित्त जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेस जिल्हाध्यक्ष आमदार बाबजानी दुर्रानी यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना भाजप सरकारवर टिका केली. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून पाच वर्षात देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तसेच भाजप सरकारने केलेली नोटबंदी सपशेल फसली असून, देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहून त्या भारावून गेल्या. त्यांनी यावेळी प्रकर्षाने महिलांच्या आडीआडचणी समजून घेतल्या. महिलांना सशक्त बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध कर्जे उपलब्ध करुन देण्यासाठी आणखी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी भाषणाच्या सुरवातीस ससंदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा गुणगौरव करत संसदरत्न हा पुरस्कार ५४५ खासदारांपैकी राष्ट्रवादीच्या खासदारांना मिळतो. हि किती अभिमानाची बाब आहे, हे सांगितले. तत्पूर्वी, आमदार विजय भांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.