परभणी - दुष्काळामुळे खरीप आणि रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर असताना विमा कंपनीने पिकविमा दिला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे सत्रच सुरू केले आहे. पाथरी तालूक्यात या पूर्वी पाच गावांनी बहिष्कार टाकला होता, यात आज (बुधवारी) आणखी एका मोठ्या गावाचा समावेश झाला आहे. या गावांनी पिकविम्याची रक्कम मिळाली नाही तर मतदानच करणार नसल्याचे निर्णय घेऊन प्रशासनाला निवेदने दिले आहे.
मागच्या खरीप हंगामात पाथरी तालूक्यातील शेतकऱ्यांनी मुग, सोयाबीन, उडीद, कापुस आदी पीके ८० ते ९० टक्के वाया गेल्याने केंद्र सरकारने दिलेल्या इफको टोकीयो कंपनीला मोठ्या प्रमाणावर विमा भरला होता. पिकांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत आल्याने त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. आता विमा मिळेल, या एका आशेवर शेतकरी होता. मात्र, जिल्हातील काही तालुक्यांना तुटपुंजा विमा दिला गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिक विम्यापासुन वंचित राहिल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे पाथरी तालुक्यात आतापर्यंत ६ गावांनी पुढील महिन्यात होणाऱ्या परभणी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकाण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कानसुर, लोणी, डाकूपिंप्री, लिंबा, अंधापुरी गावांनी बहिष्कार टाकला होता, त्यानंतर आज, बुधवारी (२७ मार्च) वाघाळा गावानेही हा निर्णय घेतला आहे. सुमारे तीनशे ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी तहसीलदारांना स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे. प्रशासन या प्रश्नांवर काय तोडगा काढणार याकडे जिल्हातील लोकांचे लक्ष लागले आहे.