परभणी - येथील पाथरी रोडवरील सेंट ऑगस्टीन इंग्लिश स्कूल या शाळेच्या व्यवस्थापनाने गेल्या वर्षभराची संपूर्ण शुल्क न भरणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे निकाल रोखून धरले आहेत. तर दुसरीकडे पालक कोरोनाच्या काळात व्यवसाय डबघाईला आल्यामुळे शाळांचे संपूर्ण शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे शाळेने संपूर्ण शुल्कासाठी तगादा लावू नये. केवळ शिकवणी शुल्क घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच शाळेबाहेर घोषणाबाजी करून आंदोलन छेडले आहे.
लॉकडाऊनमध्ये बंद राहिल्या शाळा -
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून पुढील 4 ते 6 महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळादेखील बंद राहील्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून शाळांच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिकवणी सुरू केल्या. परंतू या दरम्यान शाळेमध्ये इतर कुठलेही उपक्रम झाले नाहीत. असे असताना अनेक शाळा पालकांना संपूर्ण शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत.
शुल्क सवलतीची मागणी -
परभणीतील पाथरी रोडवरील सेंट ऑगस्टीन इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाकडून पालकांना संपूर्ण शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याने पालक संतप्त झाले आहेत. या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे इंग्रजी वर्ग चालतात. या सर्वच वर्गांच्या पालकांची शाळा व्यवस्थापन व्यवस्थापनासंदर्भात तक्रार आहे. या संदर्भात त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला एक निवेदन देखील दिले आहे. ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे सद्यपरिस्थितीत सर्व पालकांची आर्थिक परिस्थिती कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे खराब झाली आहे. याचा परिणाम आर्थिक व्यवहारावर झाला असून, अनेक पालक शाळांची संपूर्ण शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. मात्र, अशा परिस्थितीत शाळेच्या व्यवस्थापनाकडून संपूर्ण शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव आणल्या जात आहे. तर दुसरीकडे पालकांनी मात्र, सध्या ऑनलाईन क्लासेस होत असल्याने शाळेने केवळ शिकवणी शुल्क अर्थात दरमहा चारशे रुपये प्रमाणे शुल्क आकारणी करावी, अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी करणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे परीक्षांचे निकाल शाळेने पालकांना दाखविण्यास मनाई केली आहे.
प्रतिक्रिया देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाचा नकार-
दरम्यान शाळेचे वर्तन अमान्य व चुकीची असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीचा विचार करून शाळेच्या व्यवस्थापनाने शुल्कासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी जोरदार घोषणाबाजी करत शुल्क कमी झालेच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. तर अनेक पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. दरम्यान, या संदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता, शाळेच्या व्यवस्थापनाने बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा- टीएमसीचे खासदार दिनेश त्रिवेदी यांची पक्षाला सोडचिठ्ठी