परभणी - परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार ताकद लावली होती. मात्र, संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा ४२ हजार मतांनी पराभव करत आपला 'गड' कायम राखला. येथून राष्ट्रवादी जिंकणार अशी चर्चा होती मात्र, विजय शिवसेनेचाच झाला.
परभणी लोकसभा मतदारसंघात मागच्या वेळेप्रमाणे यावेळी देखील राष्ट्रवादीची हवा होती. मात्र, निकालाच्या दिवशी शिवसेनेच्या बाजूने कौल आला. राजकीय विश्लेषकसुद्धा अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्या विजयाचे गणिते मांडत होते. मतदानानंतर जे काही एक्झिट पोल जाहीर झाले, त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा बोलबाला होता. प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. मतमोजणीत अगदी पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी आपले मताधिक्य कायम ठेवले. शेवटी 42 हजार 199 इतक्या मतांच्या फरकाने त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना मात दिली. गेल्या 30 वर्षांपासून परभणीवरील शिवसेनेचा भगवा झेंडा कायम पडत आहे.
विशेषत: प्रत्येक लोकसभेच्या कार्यकाळानंतर या ठिकाणचा खासदार शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करतो. परंतू यावेळी मात्र विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आपली शिवसेनेवरची निष्ठा कायम ठेवून पक्षातच राहणे पसंत केले. मूळचे कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय जाधव यांना पक्षाने देखील पुन्हा तिकीट देऊन त्यांचा सन्मान केला. परंतू, स्थानिक मुद्दे, संजय जाधव यांचे वैयक्तिक संबंध, वागणूक याचे भांडवल करून विरोधकांनी आपली बाजू जनतेपुढे मांडली होती. परभणीत कुठलाही विकास नाही, शिक्षण, रस्ते, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक अशा प्रत्येक बाबतीत परभणी पिछाडीवर असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबी लक्षात घेऊन राजकीय विश्लेषकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कल असल्याचे मते व्यक्त केली होती. त्याचाच परिणाम राज्यभर अर्थात देशभर झालेल्या एक्झिट पोल देणाऱ्या संस्थांनी सुद्धा परभणी लोकसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचे भाकीत केले; परंतु प्रत्यक्षात मात्र मतमोजणी सुरू होताच प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवणाऱ्या संजय जाधव यांचाच शेवटी विजय झाला.
त्यांच्या या विजयात वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दलित आणि मुस्लिमांच्या मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण केले आहे. याचा फायदा शिवसेनेला झाला, दुसरीकडे राष्ट्रवादीने सोयरेधायरे एकत्र करत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम इतर समाज एकवटण्यात झाला. मोदी फॅक्टर, ओबीसी आणि वंचित आघाडी या ३ बाबींचा शिवसेनेला निश्चितच फायदा झाल्याचे दिसून येते.
या निकालाचा परिणाम आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर देखील होणार आहे. परभणी विधानसभेवर देखील लोकसभेप्रमाणे ३० वर्षांहून अधिक काळापासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मध्यंतरीच्या काळात पाथरी विधानसभेत शिवसेनेने २ वेळा विजय संपादन केला. त्यामुळे परभणी व पाथरी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जाऊ लागले. आता येणाऱ्या विधानसभेत युती झाल्यास शिवसेनेच्या वाट्याला हे दोन मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. परंतू, पाथरीच्या विधानसभेवर अपक्ष तथा भाजपचे सहयोगी आमदार मोहन फड यांचा दावा अधिक मजबूत आहे. याशिवाय जिंतूर आणि गंगाखेड हे दोन मतदारसंघ असून गंगाखेड मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव दिसून येतो. याठिकाणी शिवसेना सुरुवातीपासून आपला जम आहे.