परभणी - मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वच राज्यांतील आरक्षण अडचणीत आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत त्यांच्या अधिकारातील विषय मार्गी लावत नाहीत किंवा राज्याला अधिकार देत असताना 50 टक्क्यांच्या आरक्षणाची अट शिथिल करत नाहीत, तोपर्यंत आरक्षणाचे प्रश्न कसे मार्गी लावायचे, हा प्रश्न राज्यापुढे कायम राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्ते आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या भूमिपूजनासाठी अशोक चव्हाण परभणी दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमानंतर माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'केंद्राने मराठवाड्यात दिलेले 24 पैकी 18 पॅकेजेस फेल' -
मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाचे 24 पैकी 18 पॅकेजेस फेल गेले आहेत. कारण यासाठीचे कॉन्टॅक्टर बरोबर नाहीत. परभणी जवळच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जी कंपनी करत आहे, तिने हे काम 22 टक्के निचांकी दराने घेतले आहे. 3 वर्षापासून हे काम रखडले आहे. आज त्याचा आढावा आम्ही घेतला. अशा पद्धतीने कामे कशी होतील. गुत्तेदार चुकीचे निवडले व अटी शिथिल केल्यामुळे कामे निच्चांकी दराने जात आहेत आणि मग ती कामे होतील कशी, असे आपण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना विचारणा केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा - माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, जबाब नोंदवण्यासाठी दिला 'व्हीसी'चा पर्याय
'.. तर मुंबई 6 तासात गाठता येईल' -
समृद्धी मार्गाला जोडणाऱ्या मराठवाड्यातील रस्त्याला राज्याच्या पायाभूत सुविधा समितीची मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता झाल्यानंतर नांदेडहून व्हाया हिंगोली, परभणी गेल्यानंतर औरंगाबादपर्यंत अडीच तास लागतील व पुढे चार तासात मुंबईला जाता येईल. त्यामुळे नांदेडहून मुंबईला सहा ते साडेसहा तासात जाता येईल. हे काम लवकरच मार्गी लागणार असून, यामुळे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण होणार असल्याचेदेखील अशोक चव्हाण म्हणाले.
'विधानसभेच्या अध्यक्षपदाची या अधिवेशनात निवड व्हावी' -
येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्षपद जे काँग्रेसकडे आहे, त्याची निवड व्हावी, याची अपेक्षा आहे. मात्र, कोविडची परिस्थिती असल्याने दोन दिवस आधी यावर निर्णय होईल. कारण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे ही प्रक्रिया होणार असल्याने दोन दिवस आधी त्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.
'मेडिकल कॉलेज होणार, परंतु निधीची समस्या' -
प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज व्हावे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. परंतु निधीची कमतरता असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. परभणी येथील मेडिकल कॉलेजसाठी निश्चितच सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत. परभणी, हिंगोली या जिल्ह्यातून रुग्ण नांदेडकडे येतात. त्यामुळे या ठिकाणीदेखील मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे. मात्र, सर्वच ठिकाणी एकदाच हे करणे शक्य आहे का, हा देखील खरा प्रश्न आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
'या कामांचे झाले उदघाटन' -
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते आज (मंगळवारी) परभणी तालुक्यातील त्रिधारा-उखळद-पिंपरी देशमुख-मिरखेल या 14 किमी रस्त्याच्या (450 लाख) कामांचे उदघाटन पार पडले. त्यानंतर सावली विश्रामगृहाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे (653.60 लाख) त्यांनी उदघाटन केले. तसेच परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानांच्या (13 97.68 लाख) बांधकामाचे देखील भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - Pench Tiger Reserve : वाघिणीची हरिणाच्या कळपावर झडप; पाहा व्हिडीओ