परभणी - परभणी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. या दिवशी आघाडी आणि युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होणार आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासोबत शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर सेना-भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या सोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे कोणाचे शक्ती प्रदर्शन भारी ठरते, याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रॅली काढून अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी ३ वाजता स्टेडियम मैदानावर सभा होणार आहे. या सभेला ६० ते ७० हजार लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा दुराणी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राजेश विटेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. तर आघाडीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितवरून दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी अद्याप होकार दिलेला नाही. तसेच काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख हे जोरात काम करत असल्याचे सांगितले. मात्र, ते आघाडींच्या बैठकांमध्ये अनुपस्थित राहतात. या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार गणेशराव दुधगावकर हे देखील प्रचारापासून अलिप्त राहत आहेत. या परिस्थितीत आघाडीचे शक्ती प्रदर्शन कसे होते, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे.
सकाळी 10 वाजता परभणीत येणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीचे उमेदवार संजय जाधव अर्ज भरणार आहेत. यासाठी शनिवार बाजार मैदानातून सकाळी १० वाजता शक्तीप्रदर्शनाद्वारे रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मोहन फड, माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजप नेत्या मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भाजपचे जालना जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे पाटील, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, अर्जुन सामाले, दिपक बारहाते, सदाशिव देशमुख, माणिक पोंढे पाटील, महिला आघाडीच्या विधानसभा प्रमुख आंबिका डहाळे आदी प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. ही रॅली शनिवार बाजार मैदान, नानलपेठ, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालायापर्यंत पोहोचणार आहे.
युतीत देखील फारसा समन्वय असल्याचे दिसून येत नाही. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिली. या प्रक्रियेत भाजपचे जिल्हा पदाधिकारी कुठेही सहभागी झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचे देखील शक्तीप्रदर्शन कशा पद्धतीने होईल, हे पाहावे लागेल.