परभणी - उत्तर महाराष्ट्रासह इतर भागात धो-धो बरसणारा पाऊस परभणीसह मराठवाड्यावर कमालीचा नाराज झाला आहे. चालू मौसमात केवळ तीन वेळा सरासरी दहा ते बारा मिलिमीटर पडलेल्या पावसावर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता हे पेरलेले पीक पावसाने दडी मारल्याने संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, येणाऱ्या कठीण दिवसांना कसे तोंड द्यावे, अशी चिंता व्यक्त करू लागला आहे.
परभणी जिल्ह्यात 2013 ते चालू 2019 पर्यंत एकदाही पावसाने आपली सरासरी गाठली नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी कायम दुष्काळाचा सामना करत आहेत. त्यापूर्वीचे काही वर्ष दुष्काळातच गेले. त्यामुळे या भागातील शेतकरी आत्महत्या वाढल्या. व्यवसाय ठप्प झाले. ज्यामुळे दुष्काळी परिस्थिती कायम राहिली. यंदा तरी पाऊस-पाणी समाधानकारक होऊन ही दुष्काळ परिस्थिती निवळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; मात्र, यावर्षी देखील पाऊस दगा देतो की काय? अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. या मौसमात तब्बल पंधरा ते वीस दिवस लांबलेला पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात बरसला खरा, पण त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत केवळ 30 जून त्यानंतर 3 जुलै आणि 12 जुलै ला दहा ते बारा मिलिमीटर सरासरी पाऊस पडला आहे. केवळ तीन वेळा बऱ्यापैकी झालेल्या पावसावर जिल्ह्यातील शेतकर्यांनी पेरणी केली. मात्र, आता पेरलेले पीक वाया जाते की काय, दुबार पेरणी करावी लागते का ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी 774 पुर्णांक 62 मिलिमीटर एवढी आहे. परंतु गेल्या दीड महिन्यात त्यापैकी केवळ पंधरा टक्के पाऊस पडला आहे. या पावसाने अपेक्षित पावसाच्या 62 टक्के हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यात परभणी जिल्ह्यावर पावसाचा मोठा खंड राहणार आहे. त्यामुळे यंदाही पावसाची सरासरी पूर्ण होईल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
पावसामुळे शेतकरी चिंतेत -
पावसा संदर्भात शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण सध्या जमिनीला पाणी नसल्याने जमिन भेगाळत आहे. जमिनीत ओल शिल्लक राहिली नसून जमिनी पांढऱ्या पडत आहेत. शिवाय पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून लवकर पाऊस न पडल्यास पीकं हातचे जाण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी. पावसाअभावी नुकसान होत असलेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा सुरू कराण्याची मागणी शेतकरी करत आहेत.