परभणी - आतिवृष्टीने बाधित शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात जाणासाठी रस्ता नसल्याने एका शेतकऱ्याने ओढ्यावर लाकडी पूल बनवला आहे. पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील शेतकरी ज्ञानोबा सोपानराव गायकवाड यांनी हा पुल बनवून अधिकाऱ्यांची सोय केली.
तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांसारखे प्रशासकीय अधिकारी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची अट असल्याने पंचनामा व्हावा आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या शेतातील परिस्थिती पहावी, यासाठी जमेल ते प्रयत्न शेतकरी करत आहेत. शेतालगत असलेल्या ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने शेतात ये-जा कारण्यासाठीचा रस्ता बंद झाला होता. रस्ता नसल्यामुळे पंचनामा करण्यात अडचण येऊ नये म्हणून ज्ञानोबा यांनी हा पुल बंधला. गोपाळ नाईक, नामदेव नाईक, मधुकर आगलावे, तुकाराम गायकवाड, विजय माळी या शेतकऱ्यांनीही हा पूल बनवण्यासाठी ज्ञानोबा यांना मदत केली आहे.
हेही वाचा - पंचनाम्याच्या प्रश्नांना वैतागून शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी; जिंतूर तालुक्यातील प्रकार
यंदा एकट्या पाथरी मंडळात 1200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. आतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतीचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आता प्रशासनाकडे आशेने पाहत आहे.