परभणी - येथील जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने गंगाखेडमधील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून, 2 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा जुगार अड्डा शहरातील एका बंद पडलेल्या जिनिंगमध्ये सुरू होता. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी रुजू झाल्यापासून अवैध धंदेचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जुगार अड्डे, मटका, अवैद्य दारूचे अड्डे आणि अवैध मार्गाने वाळूची होणारी वाहतूक यावर त्यामुळे निंयत्रण आले आहे. गंगाखेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर कारवाई केली.
'23 पैकी 19 जुगारी फरार'
पोलीस पथकाने छापा टाकला त्यावेळी घटनास्थळी 23 जण जुगार खेळत होते. मात्र पोलिसांना पाहताच हे जुगारी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जागेवरच सोडून पळून गेले. यापैकी चार जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 19 जुगारी फरार झालेत. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह 7 मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 2 लाख 6 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विष्णू भिसे यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'वाळूची चोरटी वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई'
याच विशेष पथकाने परभणी शहरात गस्त घालत असताना युसूफ कॉलनीत वाळूने भरलेला एक टेम्पो जप्त केला. वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यावरून त्यांनी ही कारवाई केली. नवामोंढा पोलीस ठाण्यात यशवंत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.