परभणी - 'कोरोना' विषाणूचा सामना करण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन आणि संचारबंदीसारखे मोठे निर्णय शासनाने घेतले आहेत. मात्र, यामुळे खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि इतर वाहनांच्या चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शासनाने अन्य कामगारांप्रमाणे त्यांनाही आर्थिक आणि रेशनची मदत द्यावी, अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात परभणी जिल्हातील खासगी बस आणि ट्रॅव्हल्स चालकांतर्फे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. 'खासगी वाहन चालकांचा व गाडीवर काम करणाऱ्या मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन घरखर्च, शिक्षणखर्च, आजारपण, कर्जाचे हप्ते आदीसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले आहे. खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) चालकांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य, मदत जाहीर करावी. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत,' अशी मागणी त्यांनी केली आहे.
'अनेक परिवार, विद्यार्थी, व्यवसायिक, नोकरदार यांची परभणी ते पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर व इतर मोठ्या शहरात ने-आण करणाऱ्या या खासगी बस (ट्रॅव्हल्स) चालकांचे राज्याच्या परिवहन व्यवस्थेत मोलाचे योगदान आहे. मात्र मागील 50 दिवसांपासून देशभरात लाॅकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. पुढील काही काळही असाच जाणार, या चिंतेने व्यथित झालेल्या खासगी बस चालकांचा गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय मिळावा. सध्या काम बंद असल्याने चालकांचे खाण्या-पिण्याचे वांदे झाले आहेत. त्यामुळे परभणी शहरातील सरकारने आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे. सध्या परिस्थितीत समाजातील नोकरदार वर्ग, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गास मदत जाहिर केली आहे. मात्र त्याच परिस्थितीत जगणाऱ्या या चालकांवर अन्याय का,' असा सवाल या चालकांनी उपस्थित केला आहे.
या वेळी, परभणी ट्रॅव्हल्स संघटनेचे संभानाथ काळे, संभाजी तळेकर, नंदू गाडे, मुखरम खान, हमीद खान, अरुण गायकवाड, आंबेकर, कनकुट्टे, छोटू खान, रावसाहेब उजगरे, अन्वर पठाण आदींसह चालक उपस्थित होते.