परभणी - परभणी तालुक्यातील मुरूंबा येथे गेल्या दोन दिवसात कोंबड्यांसह अन्य तब्बल 700 पक्षांचा मृत्यू झाल्याने बर्डफ्लूचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय परभणी शहरातील नारायण चाळ परिसरात देखील आज (शुक्रवारी) अज्ञात आजाराने 3 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने मोठी भीती व्यक्त होत आहे. ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरूंबा (ता.परभणी) हे गाव व 5 किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
'जत्रा, बाजार, प्रदर्शनावरही प्रतिबंध -
जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या बाबतचे आदेश आज सायंकाळी जाहीर केले आहेत. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुरुंबा गावात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत गावातील कुकुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास देखील आज शुक्रवारपासून प्रतिबंध घातला आहे. शिवाय मुरुंबा आणि परिसरातील 5 किमी परिसरात संसर्ग पसरू नये म्हणून, हा परिसर देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
पशुवैद्यकीय विभागाचे पथक तळ ठोकून -
दरम्यान, कोंबड्यांचा एकामागे एक मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाचे पथक मुरूंबा येथे तळ ठोकून आहे. मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. मात्र, अद्याप मृत्युचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बर्डफ्लूचा धोका सर्वत्र वाढला आहे. हा आजार 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणू'व्दारे होतो. बर्ड फ्लूचा धोका वाढू लागल्याने सतर्कतेचा इशाराही संबंधितांकडून देण्यात आला आहे.
'नेमक्या प्रकारचा शोध घेण्याचे काम सुरू -
मुरूंबा या गावात आतापर्यंत शेकडो कोंबड्यांसह इतर पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे पथक हा प्रकार नेमका कशाचा आहे, याबाबत शोध घेत आहे. त्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अशोक लोणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के.बी. तांबे, डॉ. गिरीश लाटकर यांनी म्हटले आहे. त्यांनी गावास भेट दिली असून पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही केले आहे.