परभणी - शहरातील औषधी भवनात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. याठिकाणी जुगार खेळताना शहरातील ५ प्रतिष्ठित व्यावसायिक सापडले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून सव्वा दोन लाखांच्या रोकडसह ५ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील एका जिनिंगवर चालणाऱ्या बड्या व्यावसायिकांच्या जुगार अड्ड्यावरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच ही कारवाई झाल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. हाताला काम नसल्याने व्यावसायिक घरात बसून आहेत. मात्र, यातील काही बडे व्यवसायिक काम नसल्याने विरंगुळा म्हणून जुगार खेळत असल्याचे पुढे आले आहे. आठवड्यापूर्वी अशाच बारा व्यावसायिकांना गंगाखेड रोडवरील एका जिनिंगमध्ये जुगार खेळताना पकडून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल, मोटरसायकली जप्त केल्या. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी रात्री सहायक पोलीस अधीक्षक तथा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांच्या पथकाने रात्रीच्या पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीवरून वकील कॉलनीतील औषधी भवनात चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
या ठिकाणी पोलिसांना पाच व्यावसायिक जुगार खेळताना आढळले. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी तब्बल २ लाख २६ हजार ३५० रुपये रोकड जप्त केली आहे. शिवाय ८ मोबाईल, चार मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांमध्ये दिलीप राऊत, संजय मंत्री, चेतन मुंदडा, सतीश घाडगे आणि दीपक भानुशाली यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मध्यरात्री नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास नवा मोंढा पोलीस करत असून ही कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांच्या पथकातील जावेद खान, प्रशांत वावळे, निलेश कांबळे व शाम कुरील यांनी केली.