परभणी - दोन जिवंत काडतुसांसह एक देशी बनावटीचे पिस्टल येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.
परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शहरातील संजय गांधीनगरात ही कारवाई केली. एक व्यक्ती विनापरवाना तथा बेकायदेशीरपणे देशीबनावटीचे पिस्टल व दोन जिवंत कातडूस बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
अशी केली कारवाई -
जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आलेवार यांनी फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसूंदरे, हरिचंद खुपसे, शेख अजर, मोबीन शेख, चव्हाण, गणेश कौटकर, संजय घुगे, श्रीकृष्णा शिंदे आदींच्या पथकासह संजय गांधीनगरात एका घरात छापा टाकला. भाड्याने राहणार्या शेख बबलू शेख हसन यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल आढळले. त्याचबरोबर दोन जीवंत काडतूस सापडले.
'काडतुस, पिस्टलची किंमत 41 हजार रुपये -
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी सदर आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून बंदूकीसह दोन जिवंत काडतूस जप्त केल्या. बंदुकीसह दोन्ही काडतूसांची किंमत 41 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कर्मचारी हनुमंत जक्केवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करत आहेत.
हेही वाचा- रंजन गोगोई यांना झेड प्लस सुरक्षा; केंद्राचा निर्णय