परभणी - तालुक्यातील पिंगळी येथे एका शेतात रचलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने पाच एकरावरील सोयाबीन जळून खाक झाले आहे. ही घटना आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास घडली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे. अंबादासराव क्षीरसागर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
क्षीरसागरा यांची पिंगळी शिवारात शेती असून त्यांनी शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. पाच एकरावरील सोयाबीनची काढणी करून शेतात गंजी लावून ठेवल्या होत्या. मात्र, बुधवारी भल्या पहाटे अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप घेतले. आग सर्वत्र पसरली. आग लागल्याचे ग्रामस्थाच्या समझताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेत मालक क्षीरसागर यांना घटनेची माहिती समजताच तेही दाखल झाले. परंतू आगीत संंपूर्ण गंजी भस्मसात झाली. याप्रकरणी ताडकळस पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यामध्ये घटनास्थळी शीतपेयासह दारुची रिकामी बाटली व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. पोलिसांनी त्या जप्त केल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पाच एकरावरील जळून खाक झालेल्या सोयाबीनची किंमत 2 ते 2.5 लाख रुपये असल्याची माहिती अंबादासराव क्षीरसागर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे.