परभणी - शहरात गुरुवारी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तत्काळ तीन दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजता सुरू झालेल्या बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा पहिल्यासारखी तोबा गर्दी केली. बँकांबाहेरदेखील अनुदानाची रक्कम काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली, तर दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ असल्याने कुठेही सोशल-डिस्टन्सिंग पाळल्याचे दिसून आले नाही.
अगदी सुरुवातीपासून ग्रीनझोनमध्ये राहणारा परभणी जिल्हा गुरुवारी सापडलेल्या कोरोनाग्रस्त तरुणामुळे ऑरेंज झोन मध्ये गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना 20 एप्रिलपासून व्यापार आणि उद्योगासाठी सूट देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार परभणीच्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 17 ते 19 एप्रिल या तीन दिवसीय संचारबंदीनंतर आज सोमवारी बाजारपेठ खुली करण्याचे आदेश दिले होते. अर्थात यामध्ये केवळ किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, बँका, शासकीय कार्यालय यांनाच परवानगी देण्यात आली होती. याचा कालावधी सकाळी 7 ते दुपारी 2 असा ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी केवळ आज 20 एप्रिलपुरताच आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने उद्या 21 एप्रिलपासून बाजारपेठ उघडेल की नाही? याची अनिश्चितता आहे. त्यामुळे नागरिकांनी आज सकाळी सात वाजल्यापासून बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली.
किराणा, भाजीपाला घेण्यासाठी नागरिक दुकाने आणि रस्त्यावरच्या हातगाड्यांवर एकमेकांना चिटकून उभे असल्याचे दिसून आले. याशिवाय अनुदानची रक्कम खात्यातून काढण्यासाठी बँकांत बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. यापैकी कुठेही सोशल डिस्टन्सचा अवलंब दिसून आला नाही. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन, पोलीसदेखील सोशल डिस्टन्सिंगसाठी आज कुठेही प्रयत्न करताना दिसले नाहीत.
बाजारपेठेत काही विशिष्ट ठिकाणी फिरून पोलिसांनी आवाहन केले. मात्र, लोकांनी याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. ज्याचा परिणाम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी पार्क, क्रांतीचौक, गुजरी बाजार, अष्टभुजा देवी चौक, जुना पेडगाव रोड, वसमत रोड वरील सावली विश्रामगृहाच्या परिसरात हातगाड्यांवर लोकांची तोबा गर्दी झाली होती. तसेच शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल, बडोदा बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक आदी ठिकाणी अनुदानाची रक्कम काढण्यासाठी ग्राहकांनी भल्यामोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र ग्राहकांमध्ये कुठेही आंतर पाळण्यात आले नव्हते. ज्यामुळे लॉकडाऊनचा उद्देश सफल होताना दिसत नाही. इतके दिवस शिस्तीत वागणारे लोक आता बेशिस्त होत असून प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर भूमिका घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.