परभणी - पाथरी तालुक्यातील बस शाळेच्या वेळेत येत नसल्याने आज (गुरुवारी) शालेय विद्यार्थिनींनी तालूक्यातील बाभळगाव फाट्यावर दोन तास आंदोलन करत मानव विकास मिशनच्या बस रोखून धरल्या. यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलक विद्यार्थिनींना शांत केल्यानंतर आंदोलन संपले.
मानव विकास निर्देशांक कमी असणाऱ्या तालुक्यांसाठी राज्य सरकारने मानव विकास मिशन सुरू केले आहे. त्यानुसार पाथरी तालुक्यात हे मिशन राबविले जात आहे. या मिशनच्या माध्यमातून तालुक्यांच्या ग्रामीण भागांतील विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र निळ्या रंगाच्या बसेस मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतू पाथरी आगारात या बसेसच्या वेळापत्रकाचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. या बसेसमध्ये इतर प्रवाशांना बसवले जात असल्याने जागेअभावी काही वेळा मुलींनाच उभे राहून या बसमध्ये प्रवास करावा लागतो. या मुलींना गैरसोयीचा सामना करावा लागतो. एवढेच नाही, तर या बसेस वेळेवर येत नसल्याने शाळेला जाण्यास उशीर होऊन मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थिनींमधून महामंडळाच्या नियोजनाविषयी संतप्त भावना आहेत. याचा आज उद्रेक झाला.
पाथरी आगारातून सुटणारी पाथरी-गुंज या बसमध्ये गुंज, लोणी, बाभळगाव या तीन गावातील विद्यार्थिनी तर पाथरी कानसूर या बसेसमध्ये कानसूर येथील विद्यार्थिनी शाळेसाठी शहराच्या ठिकाणी दररोज ये-जा करतात. परंतू या बसेस उशिरा आल्याने गुरुवारी पाथरी-गुंज, पाथरी-कान्सूर या दोन्ही बस विद्यार्थिनी रोखून धरत आंदोलन केल्याने दोन तास वाहतूक खोळंबली होती.