परभणी - ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेतेमंडळींना धक्के देणारे निकाल लागले आहेत. तर काही दिग्गज नेत्यांना आपले गड राखण्यात यश आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे प्रमुख पक्षांकडून बहुमताचे दावे करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने, १५ जानेवारी रोजी ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी झाली. यात अनेक ग्रामपंचायतींचे निकाल धक्कादायक लागल्याचे दिसून आले.
परभणी तालुक्यातील महत्त्वाचे निकाल
परभणी तालुक्यातील सुमारे ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्याने ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. दरम्यान तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी येथे शिवसेनेचे गजानन देशमुख आणि डॉ. प्रमोद देशमुख यांच्या जनसेवा पॅनलने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला, तर राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जांब येथे दिवंगत माजी मंत्री रावसाहेब जामकर यांचे नातू संग्राम जामकर यांनी नवखे असून देखील गावातील प्रस्थापितांना धक्का देत विजय संपादन केला. त्यांच्या शिवसेना पुरस्कृत पॅनलचे १३ पैकी ११ सदस्य निवडून आले असून, त्यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांचा दारुण पराभव केला. तसेच मानवत मांडाखळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या पॅनलने अकरा पैकी नऊ जागांवर घवघवीत यश मिळवून प्रा. नितीन लोहट व शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले यांच्या पॅनलचा पराभव केला.
जिंतूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीकडून विजयाचा दावा
जिंतूर तालुक्यातील 104 जागांपैकी 75 जागांवर विजय मिळवण्याचा दावा भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला आहे, तर दुसरीकडे 104 पैकी 60 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने करण्यात आला आहे. जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बोरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. १७ पैकी १४ जागांवर विजय मिळवत भाजपचा दारुण पराभव केला. शिवाय दुसरी मोठी ग्रामपंचायत असलेल्या चारठाणा येथे मात्र भाजपच्या इंद्रजित घाटूळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत यांच्या पॅनलला प्रत्येकी सात अशा समसमान जागा मिळाल्या. तर बलासा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या सभापती वंदना गणेश इलग यांच्या पॅनलचा पराभव झाला. उपसभापती शरद मस्के यांच्या पॅनलचाही जोगवाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पांगरी ग्रापंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांना काठावर बहुमत मिळाले आहे. करंजी व धमधम ग्रापंचायतीत शिवसेना-भाजप पॅनल विजयी झाले आहे. रेपा ग्रामपंचायतींच्या सात जागा जिंकून राष्ट्रवादीने एक हाती वर्चस्व मिळविले आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला राठोड यांना पिंपळगाव काजळे तांडा ग्रामपंचायतीमध्ये काठावर बहुमत मिळाले आहे.
सेलू तालुक्यातील महत्त्वाचे निकाल
सेलू तालुक्यातील तांदळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलने ७ पैकी ४ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. यापुर्वी ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्य ताब्यात होती. आहेर बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या पॅनलला बहुमत मिळाले, तर वालूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय साडेगावकर यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. त्यांच्या पॅनेलने १७ पैकी ११ जागा पटकावल्या आहेत.
पाथरी तालुक्यातील महत्त्वाचे निकाल
पाथरी तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस ४, शिवसेना ३, काँग्रेसला २ जागा मिळाल्या. त्यामुळे कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नाही. हदगाव बु. ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे बाजार समिती सभापती अनिल नखाते यांच्या पॅनलला ११ पैकी ८ जागांवर विजय मिळाला. पाथरी शहरालगतच्या देवनांदरात १३ पैकी ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांनी स्वतः लक्ष घातले होते. बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधवराव जोगदंड यांच्या गटाला बाबूलतार ग्रामपंचायतमध्ये ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.
गंगाखेड तालुक्यात महाविकास आघाडीचे यश
गंगाखेड तालुक्यात महाविकास आघाडीने यश संपादन केले आहे. बहुतांश मोठ्या गावांमध्ये नागरिकांनी सरकार बाबतचा कल स्पष्ट केल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील ईसाद, पडेगाव, धारासूर, मुळी, मरडसगाव, कौडगाव, हरंगूळ, सायळा, सुपा आदी प्रमुख ग्रामपंचायतींसह ईतर अनेक गावांमध्ये महाविकास आघाडीच्या स्थानिक आघाड्यांनी विजय संपादन केल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
सोनपेठ तालुक्यातील महत्त्वाचे निकाल
सोनपेठ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत शेळगावमध्ये १५ पैकी १५ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. विटा खु. ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर गटाने ६ तर विरोधी गटाने ३ जागांवर विजय मिळविला. तर पालम तालुक्यातील आरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी ९ जागा शेकाप-राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.