परभणी - उन्हाळ्यात तापमानाचे चटके सहन करणाऱ्या परभणीकरांना हिवाळ्यात देखील बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्याच्या तापमानात घट होत असून, मंगळवारी परभणीचे तापमान चक्क 7 अंशावर आले होते. बुधवारी त्यात थोडीशी वाढ झाली असली तरी रात्री आणि सकाळच्या सुमारास वातावरणात कमालीचा गारवा निर्माण होत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्याचा सहारा घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढत जाणारी थंडी या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दाखल झाली होती. मात्र ऐन दिवाळीत तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारवा नाहीसा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमानात घट होत आहे. गेल्या चार दिवसांपासून परभणीचे किमान तापमान 10 अंशाच्या खालीच आहे. मंगळवारी तर तापमान 7.5 अंशावर आल्याने रात्री आणि सकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी पडली होती. बुधवारी तापमानात काहीशी वाढ झाली असून तापमान 10.4 अंशांवर पोहोचले आहे. मंगळवारी या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
'अतिवृष्टी आणि पाणीसाठ्यांमुळे थंडीत वाढ !'
परभणीत गेल्या काही वर्षांपासून थंडीच्या काळामध्ये अत्यअल्प तापमानाची नोंद होत आहे. हे तापमान 2 अंशांपर्यंत देखील खाली आल्याची उदाहरणे आहेत. यंदा देखील तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला होता. ज्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी देखील वाढली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे. अनेक प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. यामुळे जिल्हयात यंदा थंडी वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्या प्रमाणे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा खाली उतरत आहे.
'पारा आणखी घसरणार'
विशेष म्हणजे यावर्षी वातावरणावर 'ला नीना' चा प्रभाव आहे. ज्याचा अधिक परिणाम परभणीवर होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळा संपल्यानंतर देखील महिनाभर परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली. ज्यामुळे नदी, नाले, तलाव आणि धरणं काठोकाठ भरलेली आहेत. यामुळे देखील या शहराचे तापमान येणाऱ्या काही दिवसांत आणखी खाली येण्याची शक्यता यापूर्वीच विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी वर्तवली आहे.
'2 अंश सेल्सिअस एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद'
मराठवाड्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद परभणीत होत असते. त्या प्रमाणेच किमान तापमानाची देखील नोंद येथेच झालेली आहे. 2 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद 29 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. याप्रमाणेच 17 जानेवारी 2003 ला 2.8 आणि 18 डिसेंबर 2014 रोजी 3.6 अंश एवढया निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
'मॉर्निग-वॉक, सायकलिंग करणाऱ्यांची गर्दी वाढली'
परभणीत गेल्या 4 दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असल्याने सकाळी फिरण्यास (मॉर्निग-वॉक)ला जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. विशेषतः शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या शिवाय शहरातील पोलीस मैदान, वसमत रोड, जिंतूर रोड, नांदखेड रोड, गंगाखेड रोड तसेच अन्य भागात देखील पहाटे उठून फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या 2 ते 3 पटीने वाढल्याचे दिसत आहे. शिवाय सायकलिंग करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय झाली आहे.
'माणसांप्रमाणे जनावरांनाही शेकोट्यांचा सहारा'
बोचऱ्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आणि पहाटे शेकोट्या पेटवल्या जात आहेत. विशेष म्हणजे कायम उघड्यावर राहणाऱ्या जनावरांना देखील थंडीपासून बचाव करण्यासाठी या शेकोट्यांची गरज भासू लागली आहे. शहरात देखील ठिक-ठिकाणी शेकोट्या दिसत आहेत. ग्रामीण भागात मात्र प्रत्येक शेतावर आणि गावांमध्ये या शेकोट्या पहावयास मिळत आहेत.